top of page

Lyrics of Marathi Breathless

मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले
वाटे सोडू नये गाव, आसू डोळयांस या सांगे
गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे
धागे पाणंदीचे मनी, गाव आठवांचा जागे
सय मनात मावेना, धग उरात सोसेना
सोस सोसण्याचा भारी, त्याला वेसच दिसेना
वेळू लपेटून वाहे, माझ्या गावची ही नदी
जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती
माती भुरळ घालते, नाही विरळ हे नाते
नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते,
गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण
उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन,
गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव,
शीव ओलांडता खूपे, जसा निवडुंगाचा पेव,
मन इथेच दंगते, मन इथेच सांडते
ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते,
मन वाऱ्यावर वाहे
वारा चाफ्याशी या बोले
चाफा रामाच्या पुढयात
माझी भातुकली मांडे,
बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर,
डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर
घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ,
जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ,
माझा वाडा चिरेबंदी,
भव्य दार हुरमंजी,
मन चौकातच मध्ये
घुटमळे वृंदावनी,
घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर
त्याचा रूबाबच सांगे, कुणा नाही त्याची सर
मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा
सांज पहाटेला दुमदुमे सनई चौघडा
सदर उजव्या अंगाला, पुढे सोनाराचा सोपा
सदा आपुलकी रांधे माझ्या चुलीचा हा खोपा
माझ्या वाडयातच गोठा आणि तबेलाही तिथं
उभा मर्जीतला घोडा, गाई नांदतात इथं
अश्शा वाडयात या माझ्या
साऱ्या आठवणी ताज्या
राम पालखीला येई
त्याचा किती गाजावाजा
देवघरी ही समई, सांज तेलवात तेवे
गुण्या गोविंदाने गाई, इथे नाही हेवे-दावे
ऐकू येई घंटानाद, संगे मायेची ती हाक
ये गं परतूनी पोरी. सांगे निरोपाचा हात
सुने रान माझ्याविना, सुने शिवार फुलेना,
सुनी तट्टयाची ती गाडी, सुने मोटेचे ते पाणी
कानी नाही झुळझुळ, नाही घुंगुराची माळ
जोडी खिल्लारी राहिना, नाही ऊसाचं गुऱ्हाळ
गेली भलरी विरून, नाही कापणीची मजा
गेले गोफण नि विळा, गेली चावडीची सजा,
कोण पुसे पावलीला, आधल्याला, आठव्याला,
कोण पुसे माणसाला, पिंपळाच्या मुंजाबाला
आज पडका झडका गाव, परका परका वाटे
वाटेतले तळे एकाएकी पार आटे
धूमी धुमसते आत, तिला उंडयाचीच आस
पाणी शेंदताना जस्सा लाडे विहीरीचा जाच,
काच सुटला कधीचा, जीव मातीतच मळे
सूरपारंब्या मारूनी जीव हुतुतूही खेळे
जीव पारिजात होई, जीव निर्माल्यात सुके
जीव टाळात कुटूनी, पायी विठूच्या या झुके
जीव चोपाळयात झुले, जीव गवळणीत डोले
जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले,
जणु त्याने दाखविली मला उजेडाची वाट,
वाट चालायाला हवी कशी फिरवू मी पाठ,
पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा,
ओढी मागे मागे जीव, पडे मायेचाच वेढा
डोळे भरूनीया येती, गळा दाटूनी गं येतो
मातीच्या या विरहाने जीव कस्सानुसा होतो,
दूरदूरच्या देशांना. दाही-दाहीच्या दिशांना मला जायलाच हवे, मला जिंकायाला हवे,
'लेक परक्याचे धन' मला खोडायाला हवे,
माती देईलच बळ, माती दावील आभाळ,
घरी परतूनी येता, माती करील जवळ!!

- गायन : बेला शेंडे

- संगीत : तेजस चव्हाण

- गीत : प्राजक्ता गव्हाणे

- व्हिडीओ : बी . महांतेश्वर 

- ध्वनी : जयदेव तेरफळे - Sound ideaz, Pune

- अल्बम : 'कण्हेरीची फुले' , Universal Music

आरोग्याचे पसायदान

आता विश्वात्मके देवे । येणे आरोग्ये रक्षावे ।

रक्षोनि मज द्यावे । जीवनदान हे ।।

 

व्याकूळांची संकटे पांगो । आता संसर्गे गती थांबो ।

धुता करस्पर्शे हटो । गोत्र भयाचे ।।

 ​

कोरोनाचे तिमिर जावो । विश्व निसर्ग धर्मे जागो ।

जो जे जाणिल तो ते सांगो । भविष्यात ।।

कष्टती डॉक्टर मंडळी । परिचारिकांची मांदियाळी ।

अविरत पोलीस सांगाती । धावती आता ।।

 

चला संकल्पू घरी राहावं ।  पेटवू नये अफवांचे गाव ।

बोलती जे उद्धव । फायद्याचे ।।

ज्ञानदेचे वार्तांकन । विनाखंड जे रात्रंदिन ।

ते मीडियाचे धीर सज्जन । सोयरे होती ।।

 

किंबहुना सर्व निरोगी । स्वस्थ राहोनी तिन्ही लोकी ।

साधुया सारी प्रगती । संतुलित ।।

 

आणि मानवाच्याही पुढे । विशेष ही पृथ्वी असे ।

इष्टारिष्ट ठरवे । बापुडी ती ।।

 

येथ बळे दृढनिश्चयेची राहो । हा होईल रोग बरा हो ।

येणे ठरे धैर्यवान जो । सुखिया झाला ।।

 

मूळ पसायदान : संत ज्ञानेश्वर

नव रुपांतर : प्राजक्ता गव्हाणे

गायन : रुपाली मोघे

​​​​​​​संगीत : अनुराग गोडबोले 

दिग्दर्शन : रोहन सदाशिव शिंगाडे

wp6046733-mahakal-4k-wallpapers_edited.jpg

Sojugada Sooju Mallige (Marathi)

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते

महादेवा.... महादेवा.... महादेवा......... महादेवा..

महादेवा..... महादेवा.... महादेवा..... महादेवा....


शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते


अंगावरी दंडावरी चढे बैरागी भस्म

सुगंधी माळ बेलपत्री महादेवा कंठी

सुगंधी माळ बेलपत्ती तुळशी कमळा

सर्वार्थे पूजेला वाहू... महादेवा चरणी

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते


रुप्याच्या पंचपात्री तूपाची पंचारती

नैवेद्या कवठ मांडियला.... महादेवा तुझिया

नैवेद्या कवठ मांडूनिया महादेवा

माघी शिवरात्री स्मरतो रे महादेवा तुजला

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते


गिरीशिखरांमार्गे कष्टी व्याकूळ भक्त

म्हणती शिवालयी नांदू... महादेवा सवे

महादेवा सवे...

महादेवा सवे...

महादेवा सवे...

गिरीशिखरांमार्गे कष्टी व्याकूळ भक्त

म्हणती महाशिवालयी नांदू... महादेव सवे

म्हणती महाशिवालयी नांदू .. परलोकी

त्यागू भवचिंता संसारी महादेवा चरणी

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते

..

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते

शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते.... महादेवा कंठी

मोगरा नि कुंद माळीते

मोगरा नि कुंद माळीते

मोगरा नि कुंद माळीते

·       Music & Singing: Ananya Bhat​ (ABC Concerts)

·       Marathi Lyrics: Prajakta Gavhane

·       Original Song: Janapada Geethe Kannada (Folk Song)

Image by John Noonan

कण्हेरीच्या फुला

कण्हेरीच्या फुला,

तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!

नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!

माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!


कण्हेरीच्या फुला,

गावचा पाऊस भारी... बेभान गं सरी!

तडातडा गारा ...शमे तहान गं उरी...

लाड पाऊस करतो ...मला कुशीत गं घेतो !

तळं साचूनी गं वेडा...जागा नौकेला या देतो !

मला एकटा बघुनी...आज घरात गाठूनी,

माझ्या डोळयापरि टिपं, त्यानं छतात गाळूनी,

तुझा सांगावा दिला...तोही हळवा झाला...

ऊनचटक्याचा सोस... त्याच्या डोळयात वाचला!


कण्हेरीच्या फुला,

माझा पाऊस गं लळा! तुझा पाऊसच झळा!!

गावचा पाऊस म्हणे रानीवनी जातो!

तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब चिंब होतो !

ताल पाऊस धरतो ...माझ्या कौलावरी गातो !

तुझ्या रंगात न्हाऊनी ...मनामनात नाचतो !!

तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप !

व्याप पावसाला किती! ...तुला नदीतीरी ताप !

तुझा नकार घेऊनी... तो गं वळवाचा आला...

अस्सा विरह सोसेना ... तो गं पुरा कोसळला !!


कण्हेरीच्या फुला,

माझा पाऊस गं भोळा ! ...तुझा पाऊस गं चाळा !!

नदीतीरी तू तिथं अंगणी मी एकटा!

माझा पाऊस सोहळा! ...तुझा पाऊस पाचोळा!

कण्हेरीच्या फुला,

तुझा पाऊस वेगळा! .... माझा पाऊस वेगळा!

- गायन : सुरेश वाडकर 

- संगीत : तेजस चव्हाण 

- गीत : प्राजक्ता गव्हाणे 

- ध्वनी : अवधूत वाडकर - Aajivasan Sounds, Mumbai

- अल्बम : 'कण्हेरीची फुले', Universal Music

गडाच्या खिंडारी


गडाच्या खिंडारी... नदीच्या कपारी
दगडात कोरल्यालं... ओस्साडं देऊळ !

नवतीच्या धान्नाला, पावून सुगीला
नीवद हिरव्या सोन्याचा...
उरसाला जाऊया, नवस फेडूया
दंडवट घालूया देवाला...
आम्हावरी त्याची छाया
जाऊ डोंगरी त्याच्या गावा !

मोडला कळस त्याचा खांबच तुटला
भगदाडी भीताडाला तिथं बुरूज फाटला
काळोखी बुडूख त्याची वळख हडप
शेंदरात माखल्यानं तिथं देवच गुडूप !

उरसाला भक्त... यकदा वरसाला फक्त !
देव एकटा राहतो कैसे दिवस काढतो?

गडाच्या खिंडारी... नदीच्या कपारी
दगडात कोरल्यालं... ओस्साड देऊळ !

भग्‌ताच्या हाकंला, ऐकून धाव्याला
धावत येतोया महाराजा...
सुखाने नांदूया, नकोच भांडूया
साकडं घालूया देवाला...
आम्हावरी त्याची माया
देव जपतो आमुच्या गावा !

आता करमेना तिथं... देव बाहेर पडला
गाव उरसाला पूजे शेंदूरल्या दगडाला !
मृगजळी नाही देव... माणसात शोधायाचा !
देव पावसाळी थेंब... चातकानं टिपायाचा !!

- गीत : प्राजक्ता गव्हाणे

- स्वर, संगीत : तेजस चव्हाण

- अल्बम : कण्हेरीची फुले, Universal Music

I m the Girl!

(Rapping)

कोणी सफेद घोड्यावरचा 

कधी राजकुमार नसतो

आपल्यासाठी पण करुन 

कोणी जिंकणारा नसतो 

किती गेले किती उरले 

आशिकाँचा बाजार भरतो 

जरी असला आशिक कोणी.. 

आपला चॉईस असतो.. 


आपल्याच तालावरती

मर्जीने चालीवरती

वाऱ्याच्या पात्यावरती

नि वळवाच्या पाऱ्याभवती

(Rapping)

मला चंद्र तारे बिरे नको

मला तुमचे मंद वारे नको 

मला हवे माझ्यापुरते

माझ्यासवे भिरभिरणारे  

माझ्या कानी गुणगुणणारे

व्हायरलवाले गाणे 

आपल्याच तालावरती

मर्जीने चालीवरती

वाऱ्याच्या पात्यावरती

नि वळवाच्या पाऱ्याभवती

मी तर थिरकत होते पाऊल

चाहूल समिंदराला नव्हती

मजनूंच्या रांगा मोडून 

भरती स्वयंवराला होती


नखरा बिखरा 

लटका झटका

नको होते काही

मीच पळवून 

न्यावा मुलगा

बेत होता शाही...


नखरा बिखरा 

लटका झटका

मीच पळवून 

न्यावा मुलगा

बेतच होता शाही


I am the Girl..

I am magical..

I gave you dreams..

Wo..ooo..ooo


I am the Girl..

I am magical..

I gave you dreams..

Wo..ooo..ooo


You are the Girl..

You are magical..

You gave me dreams..

Wo..ooo..ooo


You are the Girl..

You are magical..

You gave me dreams..

Wo..ooo..ooo


तू दिसता रे किल्मिष सारे

गळून गेले का रे

राधेभवती कान्हा भासे

वेडा कृष्ण पिसा रे

छेड ना जरा

तार ती तुझी

होऊ दे मला

शायरी तुझी


Just be mine

You will ever shine

Just be mine

You will ever shine

Wo... ooo….

I am the Girl..


I am the Girl..

I am magical..

I gave you dreams..

Wo..ooo..ooo


I am the Girl..

I am magical..

I gave you dreams..

Wo..ooo..ooo


You are the Girl..

You are magical..

You gave me dreams..

Wo..ooo..ooo


You are the Girl..

You are magical..

You gave me dreams..

Wo..ooo..ooo


अबोलीच्या ओंजळीत

गुलाबाची पाकळी

प्रेमाच्या संगाला

रंगांची रे काजळी

वाटते रे छेडावे

रूधीर ते तोलावे

हलकेच रूतावे ते

गाण्यापरी..

तुझ्याच स्पर्शाने….

तुझ्याच स्पर्शाने

तुझ्याच गाण्याला

उधळून ल्यावे रे

देहावरी

….

देहावरी


You are the Girl..

You are magical..

You gave me dreams..

Wo..ooo..ooo


You are the Girl..

You are magical..

You gave me dreams..

Wo..ooo..ooo


·       शब्द : प्राजक्ता गव्हाणे

·       संगीत: विनीत देशपांडे

·       गायन : निधी हेगडे, आयरीन क्झेविअर, विनीत 

·       ध्वनी : Dawn Studios, Pune

दिग्दर्शन : रोहन सदाशिव शिंगाडे

"स्वातंत्र्याचा लढा झाला, बापूजी म्हणाले 'खेडयांकडे चला', 'चला' म्हणून तर गेले बापूजी, पण फिरकले कोण? कोण्या बुडूख अंधारात, गुडूप निजलेल्या, दाटी-वाटीनं बुझलेल्या, बुझून विझून थिजलेल्या, हिरव्या रानात भिजलेल्या, ठिपक्या ठिपक्या एवढुश्शा चिमुकल्या खेडयापाडयांकडे फिरकणार तरी कोण? फिरकली ती एस.टी.! तांबडी माती उडवत, दिमाखात मिरवत, गावं गावं जोडत, की गावात शहरं घुसवत.. तिचा लाल पिवळा रंग, संग शहरांशी करून गेला, गावालाही चकचकाटाची स्वप्नं तेवढी दाखवून गेला.. झगझगत आली मागून लखलखणारी वीज, नीज उडवली तिने, गावं उजळवली तिने, आणला रेडीओही तिने, तिनेच टी.व्ही. दाखवला, दिपून गेले डोळे,'गाव' दिसेनासा झाला! झाला झाला खणाणत टेलिफोनचा प्रवेश.. देश जोडला म्हणे त्याने, केला पोस्टाचा भार कमी, ...अंतरही कमी! केली आतुरता कमी! म्हणे माणूस जोडला, शब्दाशब्दाने सांधला, म्हणे दुरावा मोडला की वेळेत तोलला? झाला गेला सारा बदल... आहे तो असा आहे! शिक्षणाचं वारं आहे, प्रगतीला उधाण आहे, लोकल ग्लोबल झालं ओझं संस्काराचं आहे! गाव कात टाकणारे, गाव नवे होणारे, हिरवे गाणे गाणारे, गाव वेगाने वाहणारे, आकाश कवेत घेणारे, माझ्या मनात मावणारे मला पुकारते आहे..."

Prose Marathi Breathless

Recognized by Limca Book of Records,

2013 edition

"Longest breathless speech :
Dr. Amol Kolhe of Pune, Maharashtra delivered a 24 sec non-stop Breathless speech from a para of an audio Album ‘Kanherichi Phule’ at Ajivasan Studio on March 6, 2012. The Marathi speech had 85 words. Involved were lyricist and director Prajakta Gavhane, music from Tejas Chavan, videos by Mahanteshwar Bhosage, producer Shankar Jambhalkar."

This page is last modified in April 2025

2021 - 2025 © Prajakta Gavhane

bottom of page